
अमळनेर (ता. प्रतिनिधी) – महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या पानी फाऊंडेशनच्या पुढाकाराने अमळनेर तालुक्यातील निवडक शेतकरी गटांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने मंगळग्रह मंदिराच्या सभागृहात २४ व २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
तालुक्यात पानी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकरी गट कार्यरत आहेत. त्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २० ते २५ गावांतील शेतकरी गटांना या प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले आहे. दररोज ६० शेतकरी सहभागी होतील, अशा प्रकारे एकूण १२० शेतकरी या शिबिरात सहभागी होणार आहेत.
सदर प्रशिक्षणासाठी फक्त पानी फाऊंडेशनतर्फे निवड झालेल्या शेतकऱ्यांनीच सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जलसंधारण व वॉटरशेड बांधणीसंदर्भातील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या प्रशिक्षणात दिले जाणार आहे.